Pune News : डंपरची धडक बसल्यानंतर राडारोडा अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू, कात्रज परिसरात घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कात्रज भागात खाणीत राडारोडा टाकण्यासाठी आलेला डंपर उतारावरून मागे आल्याने सुरक्षारक्षकाला डंपरची धडक बसल्यानंतर डंपरमधील राडारोडा अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. बुधवारी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू बंदगीसाहब मतेसगोळ (वय ३५) असे मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्याची पत्नी खातन मतेसगोळ (वय २५) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक बंदगी हुसेनसाहब कलबुर्गी (वय ३५, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथे पुनम पेट्रोल पंपाजवळ एका खाण आहे. या खाणीत माती, खडी, राडारोडा टाकण्यात येत आहे. बुधवारी मध्यरात्री काही डंपरमधील राडारोडा खाणीत टाकण्यात आला होता. पहाटे सव्वाचारच्या वाजता राडारोडा टाकण्यास डंपर आला. डंपर चालकाने सुरक्षारक्षक राजू याला डंपरचे मागील दार उघडण्यास सांगितले. ते दार उघडत असतानाच डंपर मागे आला. त्यात राजू यांना धडक बसली. तसेच, दार उघडले गेल्याने राडारोडा राजू यांच्या अंगावर पडला. यात ते गंभीर जखमी होऊन, त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर अग्नीशमन दलालाल पाचारण करण्यात आले होते. दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने डंपर बाजूल करून राडारोड्यातून राजू यांना बाहेर काढले, अशी माहिती सहायक फौजदार एम. एस. देशमुख यांनी दिली.