Pune News : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍यास 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ करणा-या एकास न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संबंधित मुलगी अंगणात खेळत असताना त्याने मुलीला घराच्या पोटमाळ्यावर नेवून हा प्रकार केला होता. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा निकाल दिला.

जगदीश पंढरीनाथ सोनवणे (वय ४०, रा. नाना पेठ, राजेवाडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संबंधित १० वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोनवणे विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८ साली हा प्रकार घडला होता. विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी हा खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बी. डी. निकम आणि पोलिस हवालदार विजय श्रीगादी यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्वेता शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दंडातील पाच हजार रुपये पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.