Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ‘सरशी’ ! अनेक ठिकाणी प्रस्तापितांना धक्का; चंद्रकांत पाटील, नितेश राणे, धैर्यशील माने यांच्या गावात विरोधक विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून बाजी मारली आहे. भाजपा दुसर्‍या क्रमांकावर गेली आहे़ राष्ट्रवादी तिसर्‍या तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

१४ हजार २३४ ग्रामपंचायतीपैकी जवळपास १४१० जागा या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक आघाडीकडे सर्वाधिक ५२२ जागा गेल्या आहेत. शिवसेनेने सर्वाधिक ३५९ जागा मिळविल्या आहेत. भाजपाला आतापर्यंत ३०६ जागा मिळाल्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस २२३ आणि काँग्रेसला १६७ जागा मिळाल्या आहेत. मनसेला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत.

कोल्हापूरातून पुण्यात येऊन आमदार झालेले चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी या गावात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेविरोधात आघाडी केली होती. त्यामुळे राज्यातील सर्वांचे लक्ष या गावातील मतमोजणीकडे लागले होते. शिवसेनेने या गावात सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांना मोठा धक्का बसला असून तेथे शिवसेनेने आघाडी घेतली आहे.

जळगावातील ११ पैकी ११ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकाविला आहे. गिरीश महाजन यांच्या जळगाव जामनेरमध्ये भाजपाने सर्वच्या सर्व जागा मिळविल्या आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपाचा पराभव केल्याचे दिसून येत आहे़