Pune News : महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील 20 जिल्हयांमध्ये 3 लाख लोकांसाठी कार्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पत्रकार दिनाच्या निमित्ताने राजभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात २० जिल्हयामध्ये ३ लाख लोकांसाठी केलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते फेडरेशनचे शेखर मुंदडा, शशांक ओंबासे यांनी पुरस्कार स्विकारला.

यावेळी पु.ना.गाडगीळचे सौरभ गाडगीळ, अभिनेते स्वप्नील जोशी यांसह पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोरोनाशी लढताना ज्या पत्रकारांचा मृत्यू झाला, त्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने या कार्यक्रमात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शेखर मुंदडा म्हणाले, महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ९६ संस्थाना ५ लाखांची मदत करण्यात आली. त्यामध्ये ३० वृद्धाश्रम व २२ विशेष मुलांच्या शाळांचा देखील समावेश होता. सुमारे १५ हजार सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी २० जिल्हयांमध्ये मदतकार्य केले. तसेच तब्बल ७५ हजार अन्नाची पाकीटे, २० हजार शिधा संच, १५ हजार कुटुंबांना आयुर्वेदिक काढा, २० हजार मास्क, ५ हजार फेस शिल्ड, ६५० पीपीई कीट देण्यात आले.

पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदीवासी भागांमध्ये ही मदत देण्यात आली. महा एनजीओ फेडरेनने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात ६०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. पुण्यातील पीएमपीएमएलच्या चालकांना ५०० हेल्मेट फेस शिल्ड देण्यात आले. यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.