Pune News : हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक मंडई सुरू करा, आमचा वाटा आम्हाला द्या; सामान्य जनतेचे काही घेणेदेणे नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांमुळे रस्ता शोधण्यासाठी किमान महापालिकेने दुर्बिन दिली तर बरे होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली. पदपथ पादचाऱ्यांसाठी असतात, याचेसुद्धा अतिक्रमण विभागाला भान राहिले नाही. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाशेजारील रस्त्यावर पदपथ दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असे बक्षीस येथील नागरिकांनी ठेवले आहे. या रस्त्यावरून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी जातात.

त्यांच्याबरोबर अतिक्रमण विभागाच्या गाड्याही जातात, तरीसुद्धा त्यांना अतिक्रमणाने पदपथाबरोबर रस्ता व्यापलेला का दिसत नाही, ही गंभीर बाब आहे. सामान्यांना न्याय देणे हे आमचे काम नाही, आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे, हीच भूमिका पालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

बाप रे, हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान सोलापूर रस्त्यावरील गर्दी पाहून नक्कीच मंडई असल्याचा भास सामान्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, मंडई नाही, तर हा पुणे-सोलापूर महामार्ग आहे, असे सांगताना वाहतूक विभागाला जराही संकोच वाटत नाही. हे आमचे काम नाही, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आहे, असे सांगण्यास ते कुचराई करत नाहीत. वाहतूक विभागाकडून दुचाकी उचलेगिरीचे काम इमानेइतबारे केले जाते. मात्र, त्याचवेळी त्या ठिकाणी बसलेल्या भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांना चकार शब्दांनेही का विचारत नाहीत, अशा संतप्त सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाला रविवारी सुटी न देता इतर दिवशी द्यावी, तसेच अतिक्रमणे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी होतात, त्यामुळे त्यावेळी ही यंत्रणा कार्यरत असली पाहिजे, त्या दृष्टीने वेळेचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभाग बंद करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

वाहतूक पोलीस असतात, रविवार वगळता इतर दिवशी महापालिका अतिक्रमण विभागाच्या दोन गाड्या आणि अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात. तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत. उलट कोणी विचारणा केली, तर कर्मचारी म्हणतात, त्यांच्याकडून मिळणाऱ्या भाड्यावर आमचा पगार होतो. ही वस्तुस्थिती असेल, तर सर्व रस्ताच भाजीमंडई करून टाका आणि त्यांच्याकडून भाडे वसूल करा. सामान्यांनाही महामार्गावर घरे बांधू ते भाडे देतील, दुकानदारांना दुकाने टाकू द्या, ते भाडे देतील अशा शेलक्या शब्दांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारा केला आहे. मात्र, तरीसुद्धा त्यांना काही फरक पडत नाही, असे दिसत आहे. वारंवार अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी आणि अपघात याविषयी सामान्यांकडून तक्रार केली जात आहेत. मात्र, त्याची दखल घेण्याची जराही तसदी आर्थिक हितसंबंध असल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून महामार्गावर अतिक्रमण होणार नाही, यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत. तसेच वाहतूक विभागातील अधिकाऱी त्यासाठी प्रयत्न का करीत नाहीत. प्रत्येकजण फक्त गोळा करण्यासाठी आहे की, नियोजन कऱण्यासाठी आहे, हेच कळेनासे झाले आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिका अतिक्रमण विभाग सामान्यांचे जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार का, अशी विचारणा आता नागरिक करू लागले आहेत.

ॲड. लक्ष्मी माने म्हणाल्या की, वाहतूक पोलीस सिग्नलला न थांबता आडबाजूला थांबतात. सिग्नलवर नियम मोडला की, त्यांच्यावर कारावई करतात. मात्र, अशा प्रकारची कारवाई सरसकट असणे अपेक्षित असले, तरी तसे होताना दिसत नाही. पोलीस, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांना बिनबोभाट सोडून देतात. वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत कऱण्यासाठी नियोजन करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, हडपसर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांकडून तसे कोणतेही प्रयत्न केले गेल्याचे आतापर्यंत दिसून आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.