Pune News : राज्य परिवहन महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही विशेष सेवा सुरू : विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल नऊ-दहा महिन्यांपासून सर्व व्यवस्था बंद होती. त्यामुळे देवदर्शन नाही, घराबाहेर पडता येत नव्हते. मात्र, अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, मंदिरेही भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने पुणेकरांना देवदर्शन व्हावे या भावनेतून अष्टविनायक दर्शन अशी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या माध्यमातून एसटीच्या तिजोरीत वाढ होईल आणि भाविकांना देवदर्शनही होईल, असा दुग्धशर्करा योग एसटी महामंडळाने साधला आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून अष्टविनायक दर्शन ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक संकष्ट चतुर्थीस शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव आगारातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवाजीनगर, तळेगाव आगारातून प्रतिप्रवासी ८४०, तर पिंपरी-चिंचवडमधून ८८० रुपये आकारणी करण्यात येणार आहे.

अष्टविनायक दर्शन गाड्या थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजनगाव दर्शन करून ओझर येथे मुक्कामी असतील. ओझर गणपती देवस्थान येथे अल्प दरात मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा खर्च प्रवाशाने करायचा आहे. जानेवारीमधील संकष्टी ३१ तारखेला असून, या दिवशीच्या बससाठी आरक्षण प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी स्वारगेट स्थानकातून दर रविवारी महाबळेश्वर दर्शन बसही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर आगारातून ११ मारुती दर्शन ही बस धावणार आहे. २३ जानेवारीला सकाळी सात वाजता शिवाजीनगर स्थानकातून ही बस सुटेल. ११ मारुती दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ती शिवाजीनगरला पोहोचेल.

अष्टविनायक दर्शनासाठी सुरक्षित प्रवास आणि देवदर्शन अशी व्यवस्था एसटी महामंडळाने सुरू केली आहे. या प्रवासासाठी ७९५ रुपयांची तिकीट आकारणी केली जाणार आहे. संबंधित बस आरक्षणासाठी उपलब्ध असून, या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.