Pune News : ‘ई-बाईक’ योजना प्रक्रिया स्थगित करा, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात वाढते प्रदुषण कमी व्हावे, यासाठी इलेक्ट्रिक दुचाकीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीला विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी विरोध करत पुणे महापनगरपालिका आयुक्तांना हा प्रकल्प स्थगित करण्याबाबत पत्र दिले आहे. ई-बाईक योजनेच्या नावाखाली खासगी कंपनीचे हित साधण्याची प्रक्रिया स्थगित करुन पुणेकरांच्या हिताच्या व प्रदूषण विरहित शहर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दिपाली धुमाळ यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी कडून मोठा गाजावाजा करीत सुरु केलेली सायकल योजना बंद पडलेली असताना पुणे महानगरपालिकेकडून ई-बाईक सेवा सुरु केली जातेय. शहराच्या विविध भागात या ई-बाईक उपलब्ध करुन देत नागरिकांना प्रवासासाठी नवीन पर्याय उपलब्ध करु देणार असे भासवुन विशिष्ट कंपन्यांचे हीत साधले जाणार आहे.

पुणे शहर हे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये 36 लाखांपेक्षा अधिक दुचाकी रस्त्यावर धावतात असा अहवाल पूर्वीच महापालिकेने दिला आहे. ई-बाईक ही योजना पुणे शहरात राबविणे शक्य असून ते फायदेशीर असल्याचा सकारात्मक अहवाल प्रशासनाने तयार केला. ही योजना राबविल्यास आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेची जागा असणार का खासगी जागेत चार्जिंग स्टेशन असणार याची माहिती महापालिकेने द्यावी. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व प्रदूषण विरहित शहर करण्यासाठी इलेक्ट्रिक बस हा पर्याय असू शकतो. इलेक्ट्रिक बसेस वाढवण्याऐवजी अशा प्रस्ताववर विचार करण्यामागील हेतू लक्षात येत नाही. बसने प्रवास केल्यावरच ट्रॅफिक कमी होणार आहे. ई-बाईक सारख्या योजना आणून शहरातील ट्रॅफिकमध्ये भर पडणार आहे.

शहरात आता इलेक्ट्रिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या वाढत असून यासाठी चार्जिंग स्टेशन नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ई-बाईक या योजनेतून मनपाच्या जागेत चार्जिंग स्टेशन करणार का अन्य ठिकाणी करणार याबाबत खुलासा करण्याची मागणी दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.