Pune News : हडपसरमधील नवरत्नांच्या कार्याला दिले बळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  विविध क्षेत्रात कार्यरत नवरत्नांचा होणारा सन्मान, त्यांचे कार्य समाजासमोर आणून पुरस्काररुपी शाबासकीची थाप दिली पाहिजे. त्यांच्या कार्यास अधिक बळ देण्याचे कार्य लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजाभाऊ होले यांच्याकडून केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत संत शिरोमणी सावता माळी यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी व्यक्त केले.

फुरसुंगी (तुकाईदर्शन) येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने लोककल्याण साधना गौरव पुरस्कार वितरण वसेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक गणेश ढोरे, लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, उद्योगपती विशाल कामठे, सागर पिलाणे, दिपक भोसले, रमेश निवंगुणे आदि उपस्थित होते. यावेळी लोककल्याण राष्ट्र साधना गौरव पुरस्कार- सहायक पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मण थोरात, समाज साधना- शादाब मुलाणी, सहकार साधना- महेश ससाणे, उद्योग साधना- सुनील पिलाणे, ज्ञान साधना- ज्ञानेश्वर पिलाणे, धर्म साधना- अनिल जैन, क्रीडा साधना- तुषार पवार, पत्रकारिता साधना- संदीप जगदाळे, मात-पितृ गौरव मोतीराम कोरे व शिवगंगा कोरे यांना शाल श्रीफळ मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

वसेकर महाराज म्हणाले की, संत सावता महाराज हे कार्यात जसे विठ्ठल पहात, तसेच राजाभाऊ होले यांनी सामाजिक कार्यातच देव पाहून समाजसेवा सुरू ठेवली आहे.

दिलीप भामे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. टी. पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रदिप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद सातव, प्रविण होले, प्रभाकर शिंदे, राहुल भाडळे व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.