Pune News : चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी – डॉ. कल्याण गंगवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. काल-परवा मांजाने गळा कापल्याच्या घटना ताज्या आहेत. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे. ”

“या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १८ वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या सात वर्षात जवळपास २०० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, डॉ. गंगवाल (९८२३०१७३४३) यांच्याकडे जखमी पक्ष्यांबाबत माहिती द्यावी. या मोहिमेत अहिंसाप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

यंदा पक्ष्यांवर संक्रात ओढवली
कोरोनापाठोपाठ राज्यातही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग पसरत असून, लाखो पक्ष्यांचे जीव जात आहेत. परभणी, बीडसह अन्य जिल्ह्यात कोंबड्या, कावळे व इतर पक्षी मरण पावत आहेत. वेळीच यावर उपाययोजना करून या निष्पाप जीवांचे रक्षण करायला हवे. पक्ष्यांवर ओढवलेली यंदाची संक्रात दूर करण्यासाठी सर्वानी या पक्षी बचाव मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.