Pune News : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शाळांसाठी विद्यार्थी सहाय्य योजना महत्वपूर्ण ठरेल – अजित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रक्रमी राहिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि मराठी शाळांना मोठा हातभार लागेल, असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठ च्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शाळांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी एक हजार विद्यार्थ्यांची वार्षिक फी थेट त्यांच्या शाळेत भरण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या हस्ते करण्यात आला. अजित पवार यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

नवीन सर्किट हाऊस येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास माजी महापौर दत्ता धनकवडे, अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक युवराज बेलदरे, महेंद्र पठारे, माजी नगरसेवक संतोष फरांदे, स्वीकृत सदस्य युवराज रेणुसे , धनकवडी येथील बालाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नायडू, वामनराव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर बोरसे आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक व चिंतामणी विद्यापीठाचे प्रमुख अप्पा रेणुसे यांनी यावेळी उपक्रमाची माहिती दिली. रेणुसे म्हणाले, की कोरोना मुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. कोरोनाकाळात राष्ट्रवादी काँग्रेस ने नागरिक व रुग्णांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थचक्र थांबल्याने विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, विशेषतः मराठी शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणात केवळ फी भरणे शक्य नसल्याने अडथळे येऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जवळपास 29 मराठी माध्यमाच्या शाळातील एक हजार विदयार्थी व विदयार्थ्यांनींची फी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. फी ची रक्कम थेट त्यांच्या शाळेत भरण्यात आल्याने आर्थिक स्थितीमुळे अडचणीत आलेल्या शाळांनाही यामुळे सावरायला थोडीफार मदत होणार होईल, हा देखील या उपक्रमा मागील हेतू आहे. कोरोनामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक फी च्या रकमेचे धनादेश अदा करून उपक्रमाची सुरुवात करताना मनस्वी आनंद होत आहे.

मुख्याध्यापक संजय नायडू यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना या उवक्रमामुळे गरीब विद्यार्थी आणि आमच्या शाळेलाही मोठी मदत झाली. कोरोना मुळे शाळाही आर्थिक अडचणीत आल्या आहेत.शासनाने विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी अजित पवार यांच्याकडे केली.

अरे व्वा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या दोन शालेय विदयार्थीनी आणि एका विदयार्थ्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शिक्षण घेऊन पुढे काय करणार असे विचारल्यावर ओंकार मारचेट्टी या विद्यार्थ्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर असे उत्तर दिले, तर नानु शर्मा या विद्यार्थिनीने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्यावेळी अजित पवार यांनी ‘अरे व्वा ‘ अशी दाद देत त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.