Pune News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पतीचे दोन महिलांशी असलेले विवाहबाह्य संबंध समजल्याने पत्नीस पती व संबंधित दोन महिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात एक महिलेला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सोनाली बंडू गायकवाड (वय 24, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. गौरी रामदास गायकवाड (वय 24) यांनी नऊ नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली होती. या गुन्ह्यात गौरी हिचा पती रामदास याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गौरी यांचे भाऊ जयदीप हांडे (वय 27, रा. हरियाना, मूळ रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 2017 ते 9 मार्च 2020 या कालावधीत ही घटना घडली. गौरी हिला आपल्या पतीचे दोन महिलांबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यामुळे गौरी हिचेच अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन रामदास आणि इतर दोन महिलांनी वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सोनाली यांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तिला 17 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.