Pune News : सुपरनोव्हाज, विरा वॉरियर्सचा विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – फुरसुंगी येथे सुरु असलेल्या वेंकीज प्रस्तुत वॉरियर्स महिला प्रिमीयर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत एच. पी. सुपर नोव्हाज आणि विरा वॉरियर्स संघांनी शानदार विजय मिळविले. तीन सामन्यात सुपरनोव्हाजचा दुसरा विजय ठरला, तर विरा वॉरियर्सने विजयी सलामी दिली.

एच.पी. सुपरनोव्हाज संघाने आज पुन्हा एकदा आपली गाडी विजयाच्या मार्गावर आणली. त्यांनी आर्य स्पोर्टस संघाचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आर्य स्पोर्टस संघाला २० षटकांत ९ बाद ७४ धावांचीच मजल मारता आली. सलामीला ईश्वरी अवसरे (१६) आणि श्रावणी देसाई (३३) या दोघी वगळता त्यांच्या एकीलाही दोन आकडी मजल मारता आली नाही.

सुपरनोव्हाज संघाच्या भक्ती मिरजकर हिने ५ धावां ३ गडी बाद केले. तिला इशिता खळे आणि पूनम खेमनार या दोघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आव्हानाचा पाठलाग करताना सुपरनोव्हाज संघाने १६.३ षटकांतच ३ बाद ७६ धावा करून विजय मिळविला. त्यांच्या पूनम खेमनार हिने फलंदाजीतही चमकदार कामगिरी दाखवताना नाबाद ३८ धावांची खेळी केली. सोनल पाटिल हिने ११ धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात विरा वॉरियर्सने विजयी सलामी देताना सिंबा वॉरियर्सचा ८४ धावांनी पराभव केला. विरा वॉरियर्सच्या साक्षी कनाडी हिने सलामीला २२ चेंडूंत २३ धावांची खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांत सायली लोणकरने चेंडूला धाव याप्रमाणे ३४, तर साक्षी वाघमोडे हिने २९ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यांना २२ अवांतर धावांचा बोनसही मिळाला. त्यांनी २० षटकांत ७ बाद १३३ धावा केल्या.

पहिल्या सामन्यात सहज विजय मिळविणाऱ्या सिंबा वॉरियर्सला मात्र हे आव्हान पेलवले नाही. तन्वी पाटिल आणि रुतु पाटिल यांच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव १२.२ षटकांत ४९ धावांतच आटोपला. किरण नवगिरे (१४) वगळता त्यांच्या एकीलाही दोन आकडी मजल मारता आली नाही. सायली आणि तन्वी दोघींनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. सायली लोणकर आणि क्षितीजा नटकार यांनी दोन-दोन गडी बाद केले.