Pune News : स्वारगेट-हडपसर रस्तारुंद होणार तरी कधी ! अपघाताची मालिका सुरूच; रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली राजकारणी आणि प्रशासनाकडून पुणेकरांची दिशाभूल केली जात आहे. कारण मागिल अनेक वर्षांपासून पुलगेट-हडपसर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरूच आहे. अद्याप ते पूर्ण झाले नाही. रस्तारुंदीकरणाबरोबर पर्यायी रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याविषयी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, असा सल्ला सूज्ञ नागरिकांनी दिला आहे.

सोलापूर महामार्गावर पुलगेट ते हडपसर दरम्यान वाहनांची वर्दळ वाढली असल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाचे काम मागिल अऩेक वर्षांपूर्वी हाती घेतले. त्यामध्ये रस्ता रुंदीकरण, पदपथ, सायकलट्रॅक अशा एक ना अनेक कामांचा समावेश केला होता. मात्र, त्यातील एकही काम अद्याप पूर्ण झाले नाही. मात्र, चौकाचौकात वाहतूक पोलीस दंड वसुलीसाठी तैनात करण्यात प्रशासनाने बाजी मारली आहे.

गोळीबार मैदान, पुलगेट, वानवडी वाहतूक शाखा, भैरोबानाला चौक, फातिमानगर चौक, काळुबाई चौक, क्रोम मॉल चौक, रामटेकडी चौक, वैदूवाडी चौक, मगरपट्टा चौक, गांधी चौक, हडपसर गाडीतळ, रवीदर्शन चौक, मांजरी फाटा या ठिकाणी वाहतूक सुरूळीत कऱण्यासाठी सिग्नल व्यवस्थेबरोबर पोलीस यंत्रणाही कार्यरत असते. वाहतूक पोलिसांचे काम वाहतूक सुरळीत करणे हे असले तरी वाहनचालकांना अडवून वाहन तपासणीच्या नावाखाली दंड वसुली करण्याचे काम इमानेइतबारे केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागत आहे. त्यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य आणि ज्यांचे कोणी नाही अशा वाहनचालकांकडून दंड वसुली केली जात आहे. राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनाही इमाने इतबारे सूट देऊन बिनबोभाट सोडून देतात, याला काय म्हणायचे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर पुलगेट-हडपसर दरम्यान वाहन चालविणे म्हणजे सुळावरची पोळी आहे, अशीच संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून दिली जात आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात रस्ते वाढले नाहीत. पालिका प्रशासनाने पर्यायी रस्त्यांचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाप सक्षम केली, तर सामान्य नागरिक खासगी वाहन वापरणार नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये बेस्ट आणि लोकलने अधिकारी-कर्मचारी प्रवास करतात. मुंबईसारख्या पद्धतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.

सचिन कदम म्हणाले की, मी वारंवार बारामती-मुंबई दरम्यान वाहन चालवितो. मात्र, हडपसरमध्ये आल्यानंतर वाहनचालविताना अंगावर काटाच येतो. प्रचंड वाहनांची गर्दी, अरुंद रस्ते अशी भयावह अवस्था आहे. मागिल अनेक वर्षांपासून रस्त्यावर वाहनचालविण्याची परिस्थिती बिकट बनत आहे.