Pune News : तलवारी अन् तीक्ष्ण हत्यारांचे स्टेट्स WhatsApp ला ठेवून जनता वसाहतीत दहशत; सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तलवारी अन तीक्ष्ण हत्यारांचे व्हाट्सअप स्टेट्सला ठेवून जनता वसाहतीत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ते सततच तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवत असल्याचे समोर आले आहे.

अमर लक्ष्मण गायकवाड (वय 23, रा. मनपा शाळेसमोर, जनता वसाहत) व भीमा शत्रूघ्न शिंदे (वय 22, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंड गजा मारणे याच्या रॉयल इन्ट्रीचे व्हिडीओ अन फोटो त्याचे अनेक चाहत्यांनी व्हाट्सअप स्टेट्सला ठेवले होते. त्यातूनच पोलिसांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्यावरून एक गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी पोलिसांनी सोशल मीडियावर नजर ठेवत या माध्यमातून गुन्हेगारी करणे किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. एमपीडीए आणि मोक्का कारवाई करण्यात येत आहे.

या अनुषंगाने प्रत्येक ठाण्याला हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस हवालदार कुंदन शिंदे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की दोघेजण व्हाट्सअप स्टेट्सला तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करत असून, सध्या दोघांकडे एक-एक हत्यार आहे व ते जनता वसाहत येथे थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी प्रमोद भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर व बजरंग पवार यांच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडे लोखंडी तलवार व पालघन सारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

अमर गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो गेल्या काही दिवसापासून साथीदार यांच्यासोबत व्हाट्सअपला सतत शस्त्र घेऊन स्टेट्स ठेवत असल्याचे सांगण्यात आले आहे.