Pune News : तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी पकडले

पुणे (Pune) : पोलिसनामा ऑनलाईन – तडीपार केले असतानाही हद्दीत आलेल्या गुंडाला समर्थ पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. सागर भुजंग नायडु (वय २५, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.

समर्थ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले की पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व पोलीस शिपाई हेमंत पेरणे व विठ्ठल चोरमले हे पेट्रोलिंग करीत असताना पेरणे यांना सागर नायडु हा शाहु उद्यानजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवून तपास पथकातील कर्मचारी तातडीने रवाना झाले. पोलिसांना पाहून सागर पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.

समर्थ पोलीस ठाण्यातून त्याला २६ मार्च २०१९ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यापूर्वी त्याच्यावर शरीराविरुद्ध ६ व आर्म अ‍ॅक्टचा १ असे ७ गुन्हे दाखल आहेत.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते, सुरेश चौधर, कर्मचारी हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, प्रशांत सरक, सुभाश पिंगळे, श्याम सूर्यवंशी, सचिन पवार , निलेश साबळे , सचिन गोरखे , प्रमोद जगताप , शीतल काळे यांनी केली . पुढील तपास हवालदार नितिन धोत्रे करीत आहेत.