Pune News : शिक्षक भरती घोटाळा ! विभागातील अधिकारी आणि भरती झालेले शिक्षक EoW च्या ‘रडार’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी लॉकडाऊननंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, शिक्षण विभागातील ते अधिकारी अन भरती झालेले शिक्षक रडारवर आले आहेत. सन 2011 नंतर शिक्षक भरतीला बंदी असतानाही शिक्षण विभागातील अधिकारी तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी संगणमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केला आहे. दरम्यान मध्यरात्री पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे.

याप्रकरणी तत्कालीन पुणे विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, तत्कालीन शिक्षण अधिकारी मुस्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर, ज्योत्स्ना शिंदे, शिक्षक संघटनेचा नेता संभाजी शिरसाठ, नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संस्थापक अध्यक्ष गोविंदराव दाभाडे, परिमल गोविंदराव दाभाडे, अश्विनी दाभाडे, दत्तात्रय कुंजीर, अर्जुन बारगजे तसेच शिक्षक मारुती हरिभाऊ नरसाळे, शुभांगीनी फुले, जयश्री काळे, अश्विनी अहिरराव, मंगेश अहिरे, प्रियंका वालकोळी, रोहिने अहिरे, भारती सोनवणे, जालिंदर सातव यांच्यासह 28 जणांवर ऑक्टोबर 2019 मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून, काल सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी छापेमारी केली आहे. यात मुख्याध्यापक तथा शिक्षक नेता असलेल्या संभाजी शिरसाठच्या मोशी प्राधिकरण येथील तीन कार्यालयात, चिखली, आळंदी, काळेवाडी आणि बंडगार्डन शाळेचे कार्यालय तसेच संघटनेच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. यामध्ये पोलिसांनी बनावट शिक्के आणि मोठ्या प्रमाणावर भरती घोटळ्यासंदर्भातील दस्तऐवज जप्त केला आहे. गुरूवारी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी जोत्सना शिंदे यांच्याकडे पोलिसांनी कागदपत्रासंबधी चौकशी केली.

2012 पासून अनुदानीत शाळामध्ये अनुदानीत पदांवर शिक्षक भरतीस बंदी असताना भरती केली. त्यासाठी बनावट शिक्क्यांचा व कागदपत्रांचा वापर केला. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यक आहे. त्यांनी प्रत्येकी दहा ते बारा लाख रूपये प्रत्येक शिक्षकाकडून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी आणखी कोणकोणत्या शिक्षकांना कोठे आणि कशा पध्दतीने भरती केले याचा तपास करायचा आहे. गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार संभाजी शिरसाठ असून नैसर्गीक तुकडी वाढ, बिंदु नियामावली व मान्यतेसाठी बनावट कागदपत्रे कोठून व कशी आणली, कोणता प्रशासकीय अधिकारी त्यास मदत करत होता. त्यातुन कोणाला आर्थिक लाभ झाला याचा तपास करायचा आहे. यामध्ये अंतरिम जामीन घेण्यात आला असून या कालावधीत कागदपत्रे नष्ट केली असण्याची शक्यता पाहता. यादरम्यान कोणती कागदत्रे नष्ट करण्यात आली आहेत का ? याचा देखील तपास करायचा असल्याने या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात तब्बल महिनाभर युक्तीवाद झाला असून 19 जानेवारी रोजी हे प्रकरण सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात आदेशासाठी ठेवण्यात आले आहे.