Pune News : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेचा पदाधिकारी संभाजी शिरसाटला अटक

पुणे (Pune) : बनावट शिक्षक भरतीच्या मान्यता तयार करुन त्या खर्‍या असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करणार्‍या प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाट याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी शिरसाट याला आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र बाबासाहेब साठे (वय ४६) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. संभाजी शिरसाट याच्यासह सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव अशोक कदम, तात्कालीन वेतन पथक अधीक्षक भविष्य निर्वाह निधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ नंतर अद्यापपर्यंत पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील शिक्षण अधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक येथे घडला असल्याचे म्हटले आहे. आरोपींनी संगनमत करुन सुबोध शिक्षण संस्थेचे लिपिक व शिपाई यांच्या खोट्या व बनावट वैयक्तिक मान्यता तयार केल्या़ त्या खर्‍या असल्याचे भासवून त्याआधारे वेतन देयके तयार करुन वेतन पथक प्राथमिक यांच्याकडे पाठवून वेतनापोटी एकूण १ लाख ४६ हजार ६०३ रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत.

शिक्षक भरतीप्रकरणात यापूर्वी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात संभाजी शिरसाट, मिनाक्षी राऊत यांचा समावेश होता. त्यात त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.