Pune News : कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर ‘त्रास’ झालेल्या त्या कर्मचाऱ्याची प्रकृती उत्तम – डॉ. आशिष भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारली असून संध्याकाळ पर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान उद्या महापालिका हद्दीत 8 केंद्रांवर प्रत्येकी 100 आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. परंतु कोविन अँप मध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने आज दुपारपर्यंत 5 केंद्रावर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

देशात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा शुभारंभ झाला. पुण्यातही 8 केंद्रावर 437 आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. यापैकी सर्व जण हे संबंधित केंद्र म्हणून जाहीर केलेल्या रुग्णालयातील आरोग्य सेवक आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला त्रास झाल्याने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारली आहे. आज त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉ. भारती यांनी दिली.
डॉ. भारती यांनी सांगितले, की पुढील टप्प्यात उद्या अर्थात मंगळवार पासून शनिवार पर्यंत आठही केंद्रांवर प्रत्येकी 100 अशा 800 सेवकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी को विन अँपवर नोंद केलेल्या सेवकांनाच ही लस देण्यात येणार आहे. परंतु आता पर्यन्त 5 केंद्रावरील सेवकांनाच अँपवरून मेसेज गेले आहेत. अँपमधील तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित 3 केंद्रावरील लसीकरणाचा कार्यक्रम आतापर्यंत तरी अनिश्चित आहे. रात्री उशिरापर्यंत उर्वरित 3 केंद्रावरील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

दरम्यान लसीकरण हे ऐच्छिक आहे. त्यामुळे नोंदणी केलेला प्रत्येक व्यक्ती लस घेईलच याबद्दल साशंकता आहे. परंतु अधिकाअधिक सेवकांनी लस घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न राहील. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार गरोदर महिला व तसेच कोरोनाची लागण होऊन केवळ दोन महिने झालेल्यांना लसीकरणातून वगळण्यात येणार आहे.