Pune News : दौंड तालुक्यात भरदिवसा महिलेवर वार करुन जबरी चोरी, परिसरात खळबळ

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – भरदिवसा घरात घुसून महिलेवर धारदार शस्त्राने वार करून घरातील दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दौंड तालुक्यातील देवळगाव गाडा येथील कवठीच्या मळ्यात आज दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तनुजा प्रशांत बारवकर (वय अंदाजे -20) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंड उपविभागीय पोलीस अधिकार धस यांच्यासह यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पुण्यातून श्वान पथक बोलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौफुला-सुपा रस्त्यावर देवळगाव गाडा गावच्या हद्दीत कवठीच्या मळ्यात मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर नंदू बारवकर यांचे घर आहे. त्यांच्या घरापासून पाचशे फुटावर संजय बारवकर यांचा बंगला आहे. मात्र चोरी झालेल्या घरात फक्त जखमी तनुजा एकट्या होत्या. घरातील इतर लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तीन ते चार जण तोंड बांधून अचानक घरात शिरले. त्यांनी कपाटातील गंठण, नेकलेस आणि कानातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. दरम्यान तनुजा यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले.