Pune News : कोरेगाव पार्कमधील ‘स्पा सेंटर’च्या मॅनेजरकडे हप्ता मागणार्‍या 2 बोगस पत्रकारांसह तिघांना अटक

पुणे : लोणी काळभोर येथे राहणारे दोघे जण पत्रकार असल्याची बतावणी करीत कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटरला दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत होते. हप्ता घेण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले़
याप्रकरणी पत्रकार विशाल कचरू पायाळ (वय २८), सनी तानाजी ताकपेरे (वय २७, दोघेही रा. कदमवाक वस्ती लोणीकाळभोर) त्यांचा साथीदार पंकेश राजू जाधव (वय ३५ रा. कोंढवा खुर्द) या तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ७ याठिकाणी स्काइन स्पा सेंटर आहे. स्पा सेंटर चालवायचे असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी पोलीस प्रवाह न्यूज चे पत्रकार विशाल पायाळ व त्याचे साथीदार यांनी वेळोवेळी मोबाईल फोनवरून तसेच समक्ष येऊन करत होते. याबाबत स्पा सेंटरचे मालक यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज देखील दाखल केला होता. त्यानुषंगाने कोरेगाव पार्क पोलिस या विषयी संबंधितांवर लक्ष ठेवून होते. सोमवारी दुपारी विशाल वायाळ, सनी ताकपेरे , पंकेश जाधव हे तिघे पुन्हा स्पा सेंटर येथे जाऊन हप्त्याच्या रकमेची मागणी केली. याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना समजताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना रोख रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले. स्पा सेंटर चे मॅनेजर मंगेश डोंगरखोस यांनी दिलेल्या फियार्दीवरून पोलिसांनी हप्ता मागणारे दोन पत्रकार व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलीस कर्मचारी दिनेश शिंदे, निशिकांत सावंत, संदीप गर्जे, गणेश गायकवाड, तुकाराम शिंदे, अमोल सोनवणे, राजेश पवार, सचिन वाघमोडे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके करीत आहेत.