Pune News : तहसीलदार म्हणून निवड झाली तरी नियुक्ती न दिल्याने शेतमजूरी करण्याची तरुणावर वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परिक्षा पाचव्यांना पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतप्त झाले असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तहसीलदार म्हणून निवड झालेल्यांना गेल्या १० महिन्यात नियुक्तीच दिली नसल्याने शेकडो तरुण अडचणीत आले आहे. एका तरुणाने ट्वीट करुन नियुक्तीबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रविण कोटकर नावाच्या तरुणाने ट्वीट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, माझी तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. ही निवड होऊन १० महिने झाले. मात्र, सरकारने अद्यापही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय. लोक आम्हाला हसतात आणि सरकारला शिव्या देतात, असे म्हणून नियुक्ती कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

लोकसेवा आयोगाने काल एमपीएससीची १४ मार्च रोजी होणारी परिक्षा कोरोनाचे कारण देऊन पाचव्यांदा पुढे ढकलली. त्यामुळे संपूर्ण राज्यात विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने फेसबुक लाईव्ह करुन दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. एका आठवड्यात परिक्षा घेणार असल्याचे सांगितले.

अगोदरच परिक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहे. त्यात पूर्वी परिक्षा देऊन पास झालेले व त्यांची निवड झाली. त्यांना अजूनही नियुक्ती न दिल्याने शेकडो तरुण आजही बेरोजगार आहेत.