Pune News : वाहतूक पोलिसांची थकित वसुली ‘जोमात’, पोलीस-अतिक्रम विभाग सुस्त; भाजीविक्रेते, फेरीवाले सुसाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडील थकित वसुलीचेकाम इमानेइतबारे सुरू आहे. मात्र, हीच इमानदारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी का दाखविली जात नाही, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान रस्त्यावर भाजीविक्रेते आणि पथारीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. अतिक्रमणच्या वाहनासमोर भाजीविक्रेते बसलेले असतात. मात्र, त्याकडे पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग गांभीर्याने का पाहत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणावर संयुक्त कारवाई केली तर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस संयुक्त कारवाई करत नाहीत. त्यातच त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळेच कारवाई केली जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर पुलगेट, रेसकोर्स, भैरोबानाला, फातिमानगर चौक, काळुबाई चौक, रामटेकडी चौक, वैदूवाडी चौक, मगरपट्टा चौक, गांधी चौक, हडपसर गाडीतळ, रवीदर्शन, पंधरा नंबर या ठिकाणी वाहतूक पोलीस संशयावरून वाहने अडवून लगेच मोबाईलवर त्यांची कुंडली काढतात आणि थकित रक्कम भरण्यासाठी तगादा लावतात. अगोदरच कोरोनामुळे कामधंदा नाही, रोजगार नाही, अशी अवस्था आहे. त्यात वाहतूक पोलीस तगादा लावत असल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न अनेक वाहनचालकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी पठाणी वसुली थांबवून सबुरीने घ्यायला पाहिजे. कारण आज सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

सोलापूर रस्त्यावर मुख्य चौकासह गर्दीच्या ठिकाणी वाहने अडवून वाहनांचा क्रमांक मोबाईलवर टाकून थकित दंड रक्कम दाखवून वाहनचालकांना वेठीस धरले जात आहे. दंड वसुली ही केलीच पाहिजे. मात्र, त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असा सबुरीचा सल्ला सूज्ञ पुणेकरांनी दिला आहे.