Pune News : येरवडा जेलमधील कैद्याकडे सापडला तंबाखूजन्य पदार्थ, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्याचे खुल्या कारागृहातून पलायन, प्रचंड खळबळ

पुणे (Pune ) : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यानंतर होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी तो पसार झाला असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दत्ता किसन गायकवाड या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गायकवाड हा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो गेल्या काही वर्षापासून येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दरम्यान त्याच्याकडे कारागृहात असताना तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यामुळे त्याला कारवाई होण्याची भीती वाटत होती. तसेच उर्वरित शिक्षा चुकवण्यासाठी तो खुल्या कारागृहातून पसार झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल (शनिवार) तो या कारागृहातून पसार झाला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत. मात्र, येरवडा कारागृहातून कैदीच पसार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.