पुणे पोलीसांच्या नवीन वाहतूक कार्यालयाचे पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात वर्षाला 30 हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी ठोस काम करावे लागणार आहे. राज्यातील सर्व घटकप्रमुखांची बैठक घेऊन यावर उपाययोजना तसेच त्यावर कारवाई करण्यासाठी ठोस आखणी केली जाईल. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती यावेळी सांगण्यात येईल. महाराष्ट्र पोलीस कुठेही कमी पडणार आहे, असे आश्वासन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले.

पुणे पोलिसांच्या वतीने वाहतूक पोलीस विभागाच्या बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सीआयडी प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख आणि शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सुसज्ज अशी इमारत येरवडा परिसरात बांधण्यात आली असून, तेथून आता वाहतूक विभागाचे काम करण्यात येत आहे. पुर्वी हा विभाग पोलीस आयुक्तालयात होता. त्याठिकाणी आता भरोसा सेल सुरू करण्यात आलेला आहे.

जयस्वाल म्हणाले, पुणे पोलीसांनी सुरू केलेल्या नवीन उपाययोजनांमुळे महाराष्ट्र पोलीसांचे नाव चांगले होत आहे. यात पोलीस आयुक्त ते पोलीस कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व सामान्यांचा सर्पोट मिळत नाही, तोपर्यंत पोलीसांचे काम पुर्णपणे होत नाही. पुणेकर आणि पुणे पोलिस खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो.

पोलीस दलात वाहतूक विभागएक महत्वपुर्ण भाग आहे. नागरिक आणि पोलिसांचा थेट संबंध येतो तो वाहतूक पोलिसांचाच. शासनाने वाहतूक पोलीसांवर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. अपघात टाळण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यावर उच्च न्यायालयाची देखरेख आहे. त्यासाठी राज्यातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेऊन उपाययोजना आखल्या जातील.

पोलीस आयुक्त यांनी यावेळी शहरात सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षी व यावर्षीच्या अपघाताची आकडेवारी दाखवत पोलीस यंदा अपघात रोखण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. तसेच गेल्या 11 महिन्यात करण्यात आलेल्या वाहतूक दंडाचीही माहिती देण्यात आली.

Visit : Policenama.com