Pune News : रामटेकडी पुलावरील सुशोभीकरणासाठी लावलेली झाडी जळाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रामटेकडी पुलावरील रस्त्याच्या बाजूला आणि दुभाजकामध्ये झाडी लावून सुशोभीकरण करण्यासाठी लावलेली झाडी जळून गेली आहेत. त्यामुळे आता गवत काढण्यासाठी खोदाई सुरू केली आहे. मागिल अनेक वर्षांपासून रस्ता सुशोभीकरणाचा प्रकार सुरू आहे. मात्र, अद्याप या ठिकाणी झाडी बहरली नाहीत, तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये झाडी लावणे आणि उन्हाळ्यामध्ये वाळल्यानंतर ती मुळासकट काढून जमीन तयार करण्याचे काम सुरू असते. प्रशासनाला सोलापूर रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरण करायचे आहे का आर्थिक हितसंबंध जोपासायचे आहेत, याचा खुलासा करावा, अशी संतप्त सवाल हडपसरवासीयांनी उपस्थित केला आहे.

अजय आगरवाल म्हणाले की, रामटेकडी पुलावरील रस्ता दुभाजक आणि बाजूला दरवर्षी झाडे लावली जातात. मात्र, तेथे एकही झाड वाढलेले वा फुललेले दिसत नाही. मात्र, त्यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा निधी खर्ची टाकला जात आहे, ही बाब नाकारून चालणार नाही. आता रामटेकडीवरील रस्त्याच्या बाजूला झाडी वाळून केली आहेत, तेथे खोदाई करण्याचे काम सुरू आहे. हाईट म्हणजे पावसाळ्यामद्ये या झाडांना टँकरने पाणी घातले जाते. उन्हाळ्यात त्या झाडांची जागा खोदली (नांगरली) जात आहे. यामध्ये नेमके कोणाचे आर्थिक हित गुंतले आहेत, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभ्यासकांकडून केली जात आहे. सामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी आता तरी थांबवा, असे सांगण्याची वेळ आली आहे.

अ‍ॅड. अमोल कापरे यांनी सांगितले की, पुणे-सोलापूर रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचा नेहमीच घाट घातला जात आहे. मात्र, त्यातील एकही काम आजपर्यंत पूर्णत्वास गेले नाही, याची वारंवार प्रचिती आली आहे. एका बाजूला रस्ता करायचा, दुसऱ्या बाजूने खोदायचा, एकादा बाजूला झाडी लावायची आणि दुसऱ्या बाजूला खोदून काढायची असा प्रकार हडपसरवासियांना नवीन नाही. रस्तारुंदीकरणबाबतही हीच परिस्थिती आहे. पुलगेट-हडपसर रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरण ही बाब हडपसरवासियांना नवीन नाही. कारण ही कामे मागिल तीस वर्षांपासून सुरू आहेत. ती अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम आणि सुशोभीकरण कधीही संपणार नाही, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. रामटेकडी, मगरपट्टा चौकामधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाण पुल उभारले, तर हडपसर गाडीतळ येथे उड्डाण पुलावर उड्डाण पुल उभारला तरी वाहतूककोंडीचे विघ्न काही संपत नाही. उलटपक्षी आता उड्डाण पुल चुकीच्या पद्धतीने उभारला गेला असा सूर काही राजकारण्यांनी आळवायला सुरूवात केली आहे, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.