Pune News : वारजे माळवाडी परिसरात दोघा सराईतांनी कोयत्याच्या धाकानं चालकाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  वारज्यात एका टेम्पो चालकाला दोन सराईत गुन्हेगारांनी कोयत्याच्या धाकाने लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण पसार झाले आहेत. शनिवारी रात्री 11 वाजता घडला आहे.

मंगेश विजय जडीतकर (वय २०,रा. दांगट पाटील नगर ), गौरव सुरेश पासलकर (वय २२,रा. वारजे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विकास जानवळे (वय२६,रा. वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी विकास टेम्पोतून आईसोबत घरी जात होते. त्यावेळी यश मित्रमंडळ चौकात मंगेश, गौरव व त्याच्या इतर दोघा साथीदारांनी टेम्पो अडविला. त्यानंतर विकास यांना टेम्पोतून जबरदस्तीने खाली ओढले. तसेच गळ्याला कोयता लावत खिशातील ३ हजार ३०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. विकास यांच्या आईला पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी दगड मारुन त्यांना दुखापत केली. टेम्पो चालकाच्या मदतीसाठी धावले असता, त्यांनाही कोयत्याच्या धाकाने आरोपींनी पळवून लावले. अधिक तपास सहायक निरीक्षक आर. व्ही. शेवते करत आहेत.