Pune News : दारूच्या वादातून दोघांचा खून ; आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दारूच्या वादातून लोखंडी पट्टीने दोघांचा खून करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल रतन कचरावत (वय 47, रा. कोंढवा गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार विश्वनाथ नामदेव शिंदे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. सलीम मेहबूब शेख (वय 45, रा. लेकटाउन, कात्रज) आणि तौफिक शेख (वय-36, रा. काकडे वस्ती, बिबवेवाडी) अशी खून झालेल्या व्यक्तींची नाव आहेत. खून झालेल्या व्यक्ती आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. सलीम शेख आणि आरोपी हे कोंढवा गंगाधाम रस्त्यावरील जय मल्हार हॉटेल मध्ये कामाला होते. तर तौफिक शेख हा नेहमी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये येत असत. शुक्रवारी (ता. 25) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सलीम श्रीजी लॉन्ससमोर गल्लीत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या अनिलने दारुवरुन त्याच्या सोबत वाद घातला.

तू रोज फुकटची दारू पीत असल्याच्या आरोप करून, इमारत बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी पट्टीने अनिलने सलीमच्या डोक्‍यात वार केले. यात सलीमचा मृत्यू झाला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील भानुप्रिया पेटकर यांनी न्यायालयात केला.

डबा घेऊन आला आणि जिवाला मुकला

अनिल आणि सलीम यांच्या वाद सुरू असताना सलीमला जेवणाचा डबा घेऊन तौफिक तेथे आला होता. त्याने अनिलला सलीमला मारताना पाहिले होते. त्यामुळे अनिलने तौफिकचा पाठलाग करून त्याच्या डोक्‍यातही पट्टीने वार केला. गंभीर जखमी तौफिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.