Pune News : मौजमजा करण्यासाठी चोरी करणारे 2 सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजा करण्यासाठी दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे विमानतळ पोलिसांनी सांगितले.

मंगेश विजय चव्हाण (वय- 22), शाहरुख इर्षाद शेख (वय-25 दोघा रा. नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मंगेश आणि शाहरुख यांनी पुणे-अहमदनगर रोडवरील हिंदवी बॅटरीच्या दुकानाचे शटर उचकटून चार लॅपटॉप, दोन मोबाईल टॅब चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना विमानतळ पोलिसांनी 75 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक विश्लेषणाने 72 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून चार लॅपटॉप, दोन मोबाइल टॅब असा एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी मंगेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अशा प्रकारचे केलेले आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत गिरी, सचिन जाधव पोलीस अंमलदार अविनाश शेवाळा, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, हरुण पठाण, राहुल मोरे, किरण अब्दागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे, गिरीष नानेकर यांच्या पथकाने केली.