Pune News : औंध परिसरात चोरट्यांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चोरट्यांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वृत्तीने पोलीसांची पुणेकरांत नाचक्की झाली आहे. पोलीसच पळ काढत असतील तर नागरिकांनी कोणाकडे जायचे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. औंध येथील सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. उपायुक्त नम्रता पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.

औंधमधील एका सोयासायटीत मध्यरात्री शस्त्रधारी चार चोरटे शिरले होते. सोसायटीत चोरटे शिरले असल्याचे समजताच ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावेळी चतुर्श्रुंगी पोलिसांनी मार्शलवर असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांना सांगितले. तात्काळ हे दोघे येथे आले. गेटवर येताच त्यांना चोरटे गेटमधून बाहेर पडतं असताना दिसून आले. त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. चोरटेच समोरून आल्यानंतर त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. त्यानंतर दुसरा देखील पळाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता.

चोरटे मुद्देमाल, शस्त्र कटावनी आणि इतर साहित्य घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहेत. यावेळी पोलीस हवालदार प्रवीण गोरे यांनी आरोपींना पाहून दुचाकी वळवली आणि ते निघून गेले. तर दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे वाहन निघून जाण्याआधी गोरे हे पोलीस हवालदार अवघडे यांना एकटे सोडून निघून गेल्याचे दिसत आहे. तर पोलीस नाईक अनिल अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनही त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. त्यामुळे पोलिसांची पुणेकरांत नाचक्की झाली.

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणा यामुळे पोलिस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे या दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.