Pune News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 7 गुन्हयांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एकाला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २५, रा. थिटे वस्ती, बैंक ऑफ बडोदाच्या पाठिमागे, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्या व वाहन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. काही केल्या या घटना कमी होत नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालून चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान सिंहगड रोड पोलीस हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान कर्मचारी शंकर कुंभार व उज्ज्वल मोकाशी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सराईत वाहन चोर महेश उर्फ मायकल याला ऍक्टिव्हासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तपास केल्यानंतर त्याने अहमदनगरसह पुण्यातील विविध भागातून 7 दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली. 1 लाख 80 हजार रुपयांच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महेश उर्फ मायकल हा कार चालक म्हणून काम करतो. त्याने मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, यांच्या पथकाने केली आहे.