Pune News : उल्हास पवार यांचे मेव्हणे अर्जुनराव जाधव यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे निवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एके ऊर्फ अर्जुनराव कृष्णराव जाधव (वय 69 वर्षे) यांचे आज पुण्यात दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांचे ते मेव्हणे होत.

सातारा जिल्ह्यातील कोडोली हे अर्जुनराव जाधव यांचे मूळ गाव. उच्चशिक्षण घेऊन ते शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी महाराष्ट्रातील कोयना धरणासह अनेक धरणे व प्रमुख जलसिंचन प्रकल्पांमध्ये दीर्घकाळ उत्तम काम केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कार व प्रशस्तिपत्रके देऊन त्यांचा गौरव केला. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. अत्यंत मनमिळाऊ व कर्मचार्‍यांमध्ये लोकप्रिय असे कर्तव्यदक्ष अधिकारी हा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. या वेळी राजकीय, शासकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत उपस्थित होते.