Pune News : पानिपतवीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना, मर्दानी खेळांचा थरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय कृष्णाजी जय दमाजी… जय पिलाजी…जय सयाजी… पानिपत वीर अमर रहे… अशा गगनभेदी घोषणांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. बडोदा संस्थान संस्थापक सेनाखासखेल समशेर बहाद्दर, पानिपतवीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार व पानिपत वीरांना मानवंदना देण्यात आली.

निमित्त होते, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान पुणे, शिवशंभू प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ दावडी-निमगाव, खेड यांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदर, दावडी येथे आयोजित पानिपत वीर मानवंदना कार्यक्रमाचे. कार्यक्रमाची सुरुवात गायकवाड किल्ल्यावर गायकवाड घराण्याचा भगवा ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत गायकवाड सरकार सदरेवर दीप प्रज्वलन, गायकवाड तख्त पूजन, गायकवाडांचे पारंपरिक शस्त्र पट्टा यांचे पूजन करण्यात आले.

विश्व शिवकालीन मर्दानी युध्दकला महासंघाच्या राजेश पाटील, लखन जाधव गुरुजी, आचार्य लुगडे यांनी दंड, ढाल तलवार, पट्टा, वीटा ही पारंपरिक शस्त्र वापरुन शास्त्रोक्त पध्दतीने सादर केलेल्या मर्दानी युध्दकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जणू शिवकाल पुन:श्च एकदा जिंवत केला आणि उपस्थितांची मने जिंकुन घेतली.

यावेळी श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिव प्रवीणभय्या गायकवाड, संतोषराजे गायकवाड, दत्ताजी गायकवाड, अभिनेत्री मृणाल गायकवाड, रवी गायकवाड, डॉ.सुधीर गायकवाड, माजी सरपंच सुरेशआप्पा डुंबरे, बाबासाहेब दिघे, संजय गायकवाड, अनिल गायकवाड, रवींद्र गायकवाड, माणिकराव गायकवाड, अभिषेक गायकवाड, विवेक गायकवाड, सुमीत गायकवाड तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातून आलेले गायकवाड स्वराज्यघराण्यांचे वंशज, माता भगिनी, सरदारांचे वंशज, दावडी निमगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे सचिव, वंशवेलकार, मानव वंशाचे अभ्यासक, वैदिक काळापासून राज्यव्यवस्थेचे इतिहास तज्ञ, गायकवाड घराण्याच्या चांदखेड शाखेचे वंशज प्रवीणभय्या गायकवाड यांनी गायकवाड घराण्याची उत्पत्ती तसेच गायकवाड स्वराज्य घराण्याचा विस्तृत कुलवृतांत सदरेवर सांगितला. मानवंदनेव्यतिरिक्त प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती १९ फेब्रुवारीचा श्रीमंत गायकवाड स्वराज्यरथ सोहळा, गायकवाड कुळ संमेलन, ६ जुन शिवराज्याभिषेक दिन रक्तदान मानवंदना, गायकवाड गढी संवर्धन, दिवाळीतील दीपोत्सव, गोपुजन हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, असे अमित गायकवाड यांनी सांगितले.