Pune News : अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; वातावरणातील बदल आणि वाढत्या कोरोनामुळे नागरिकांत घबराट

पुणे : मगिल दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली आणि शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटात सापडला आहे. मागिल वर्षभर कोरोनाचे संकट, त्यात दिवाळीमध्ये परतीच्या पावसाचा झटका बसला. हरभरा, गहू, ज्वारी, पालेभाज्या, फळभाज्या, फळबागा, टोमॅटो आणि काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हवेली तालुक्यातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीमुळे पिके भुईसपाट झाली आहेत. टोमॅटो पिकाचे व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचले असून, मांजरी खुर्द येथील शेतकरी अशोक आव्हाळे यांनी सांगितले.

थेऊर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, कोलवडी, मांजरी खुर्द आमि बुद्रुक, वाघोली, फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात वादळी वाऱ्यास हलका पाऊस पडला. त्यामुळे आता कुठे सावरत असलेला शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, हे कायमचे दुखणे आहे. शेतामध्ये राबराब राबायचे आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने नाही, तर बाजारबुणग्यांनी हिरावून घ्यायचा, अशी स्थिती शेतकऱ्यांची आहे.

आव्हाळे म्हणाले की, नाशवंत भाजीपाल्यासह तरकारी मालाला कधी तरी भाव मिळतो, तर लगेच भाव वाढल्याची ओरड होते. मात्र, शेतमालाचे बियाणे, खत, मेहमत आणि वाहतूकखर्चही निघत नाही, त्यावेळी कोणी ओरड करत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. शेतमालाला हमीभाव द्यावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे राजकारणी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाही. निवडणुका आल्या की, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये भल्या मोठ्या योजना आणि आश्वासने असतात. मात्र, निवडणुका झाल्या की, त्या साऱ्या योजना आणि आश्वासनांचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. पुन्हा त्याकडे पाच वर्षे कोणी पाहात नाही.

शेतकरी, कष्टकरी आणि कंपन्या-उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकऱ्यंचीही अशीच अवस्था झाली आहे. आर्थिक मंदी आणि आता कोरोनाचे कारण दाखवत अनेक उद्योगधंदे, कंपन्यांतील कामगारांचे पगार कपात केले, तर अनेकांना घरी बसवले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली असून, गुन्हेगारी वाढते की काय असा प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे. कोरोनाचे सावट आता कोठे दूर होत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

सावधान…

मागिल चार-पाच महिन्यांपासून कोरोनाचा ज्वर कमी झपाट्याने कमी होत होता. मात्र, मागिल चार-पाच दिवसांपासून हवामानामध्ये मोठा बदल झाला, त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक बनत आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियम अटींचे पालन करणे गरजेचे आहे.