Pune News : सासवड रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांची भाजी फेकली रस्त्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर-सासवड रस्त्यावर तुकाईदर्शनसमोरील भाजीविक्रेत्यांवर कारवाई करत भाजीची गाठोडे उचलून नेले, तर काहींनी विरोध केला म्हणून त्यांची रस्त्यावर भाजी फेकून दिली. राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. दरम्यान, फरसान, भेळ, पाणीपुरीवाले, आईस्क्रीमच्या गाड्या आणि दुकानदारांची अतिक्रमणे रस्त्यापर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित नागरिकांनी केली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यावर कारवाई केली ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, भाजीपाल्याची नासधूस करण्याचा त्यांना अधिकार दिला आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकविलेला माल नासधूस करण्यासाठी आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कोणीही त्रास दिला तर खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. तरीसुद्धा पालिकेचे मग्रूर कर्मचारी अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी कसे वागू शकतात, अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शेतमालाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होऊ लागली आहे.

अमृत बिरबळे म्हणाले की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यावर जरूर कारवाई केली पाहिजे. मात्र, कारवाई करताना दुजाभाव करू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे. हडपसर-सासवड रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. हडपसर-सासवड रस्तारुंदीकरणासाठी अनेक जुन्या झाडांची कत्तल केली. मात्र, रस्तारुंदीकरण अद्याप रखडले आहे. हडपसर गाडीतळ ते तुकाईदर्शन दरम्यान रस्तारुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले. त्याचबरोबर सायकलट्रॅक आणि पदपथही उभारले आहेत. मात्र, सायकलट्रॅकवर सायकल धावत नसली तरी तेथे हक्काचे वाहनतळ झाले आहे. पदपथ दुकानदारांसाठी पार्किंग आणि दुकानातील माल बाहेर ठेवण्यासाठी हक्काची जागा बनली आहे. लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का, अशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसर-सासवड रस्त्याचे पालखी मार्ग असे नामकरण केले. रस्ता रुंदीकरणासाठी अनेक झाडांची कत्तल केली. मात्र रुंदीकरण अद्याप झाले नसले तरी, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉटेलसह अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून सात-बाराच स्वतःच्या नावाने करून घेतला आहे की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुकाईदर्शन चौक ते दिवेघाटापर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. साईडपट्ट्या खचल्या असल्याने वारंवार अपघात होत आहेत, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब निश्चितच अशोभनीय आहे.