Pune News : सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल हस्तगत, डेक्कन पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुठा नदी पात्रालगतच्या रस्त्यावर थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून डेक्कन पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

शगुन जोगदंड (वय २७, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात जोगदंड विरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी पोलीसनामा ला दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे कर्मचारी सचिन कदम यांना नदी पात्रातील रस्त्यावर एक जण थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरुन पकडले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे असा २६ हजार रुपयांचा माल आढळून आला. शगुन जोगदंड हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

परिमंडळ १ चे उपायुक्त प्रियांका नारनवरे , सहायक पोलिस आयुक्त मालोजीराव पाटील , डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजू चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक किशोर शिंदे, कर्मचारी सचिन कदम, बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण, श्रीकांत लोढे, ज्योतीराम मोरे, शेखर शिंदे यांनी तपास केला.