Pune News : चोरीच्या गुन्हयात 10 वर्षांपासून फरार असलेल्या एकाला वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चोरीच्या गुन्ह्यात गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या एकाला वानवडी पोलिसांनी सापळा रचून बेळगाव जिल्ह्यातून अटक केली आहे. मित्राच्या मामाकडे एक दिवसासाठी राहण्यास आल्यानंतर तिघांनी चोरी केली होती.

आनंद राजगोपाल चिंडक (वय 33, रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

शहरात आरोपी, फरार गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान चोरीच्या गुन्ह्यात गेल्या 10 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आनंद चिंडक हा कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यात असल्याची माहिती सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप गुरव यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अहिवळे पथकातील प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, ज्ञानदेव गिरमकर, शिरीष गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून कर्नाटक येथून अटक केली आहे.

चिंडक व त्याचे दोन साथीदार वानवडी येथील त्यांच्या एका मित्राच्या मामाच्या घरी राहण्यास आले होते. यावेळी त्यांनी मामाच्या घरातून पावणे तीन लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले होते. 2011 साली हा प्रकार घडला होता. यानंतर पोलिसांनी सचिन माने, दिनार सामंत या दोघांना पकडले होते. पण चिंडक हा पोलिसांना गुंगारा देत होता. पण त्याला पकडण्यात यश आले आहे.