Pune News : वॉरियर्स स्पोर्टसच्या वतीने ‘वॉरियर्स महिला प्रमियर लीग’ १७ जानेवारीपासून !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  फुरसुंगी येथील वॉरियर्स स्पोर्टसच्या वतीने प्रथमच महिलांच्या टी २० प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ते २४ जानेवारी दरम्यान फुरसुंगी येथील वॉरियर्स फिल्डच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे स्पर्धेचे वेळापत्रक बदलावे लागले आणि नवीन वेळापत्रकासह ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक स्वप्निल मोडक यांनी दिली.

महाराष्ट्रातील मुलींना वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेत एकूण ८ संघ असतील. स्पर्धेतील विजेत्या संघाला एकूण १ लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेता संघ ५० हजार रुपये पारितोषिकाचा धनी होईल.

यात एकूण १२० मुलींचा सहभाग असून, या मुलींची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा लिलाव गुण पद्धतीने करण्यात आला आणि निवडलेल्या १२० खेळाडूंची विभागणी आठ संघांमध्ये करण्यात आली. या स्पर्धेला ग्रामीण भागातील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बाहेरगावातून येणाऱ्या मुलींची राहण्याची व जेवण्याची सोय आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.

अनुभवी खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील संघाची कर्णधार आणि आशिया करंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली तेजल हसबनीस ही स्पर्धेत रायझिंग प्लेअर्स, मुंबई संघाची कर्णधार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या चॅलेंजर करंडक स्पर्धेत भारत अ संघातून खेळलेली शिवाली शिंदे हे शिरसाठ स्पोर्टस संघाचे नेतृत्व करेल. याच स्पर्धेत खेळलेली माया सोनावणे तनिष्का फायटर्स, तर इंडिया ग्रीन संघाची उत्कर्षा पवार ही आर्या स्पोर्टस संघाची कर्णधार असेल. यांच्या खेरीज सायली लोणकर (वीरा वॉरियर्स), मुक्ता मगरे (पीएमपी ग्रुप), पूनम खेमनार (एच.पी. सुपरनोव्हाज), किरण नवगिरे (सिम्हा वॉरियर्स) या खेळाडू विविध संघांचे नेतृत्व करणार आहेत.