थंडी, पाऊस, गारपीट आणि उन्हाचा चटका; पुन्हा गारठ्याची शक्यता ! फेब्रुवारी ठरला त्रि-ऋतुचक्रमासाचा

पुणे : मागिल वर्षभरापासून कोरोनाची भीती, त्यातच उन-पावसाचा खेळ आणि फेब्रुवारी महिन्यात तर निसर्गाचा नूरच बदलून गेला आहे. चक्क उन, पाऊस आणि थंडी असा त्रिवेणी संगमाचा महिना असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जानेवारीच्या मध्यापासून आजपर्यंत वातावरण दरदिवशी नवा नूर दाखवित असल्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये बारमाही त्रि-ऋतुचक्रमास असल्याची स्थिती पाहायला मिळाली. आतापर्यंत अशी परिस्थिती कधीही अनुभवली नाही, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

वातावरणातील बदलामुळे कोरोनाचे रुग्णवाढ ही सर्वांचीच डोकेदुखी वाढणारी ठरत आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्याची थंडीने सुरुवात झाली असली, तरी मध्यानंतर पावसाळी स्थिती निर्माण झाली. या काळात अवकाळी जोरदार बसरला आणि गारपीटही झाली. त्यानंतर लगोलग दिवसाच्या कमाल तापमानात उन्हाळ्याप्रमाणे वाढ होत ते ३७-३८ अंश सेल्सिअसच्या आसपास आले.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात १७ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या तीनही विभागातील काही भागांना अवकाळीसह गारपिटीने झोपडून काढले. यात शेतीमालाची मोठी हानी झाली. १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत मुंबई परिसरासह कोकणातही काही हलक्या पावसाची हजेरी होती. कमी दाबाचा पट्टा विरल्यानंतर दोन-तीन दिवस पुन्हा गारवा आणि २० फेब्रुवारीपासून दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली. मुंबई परिसरात या काळात राज्यातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भाचा पारा ३७ ते ३८ अंशांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे घामाच्या धारा आणि उन्हाच्या चटक्याचाही अनुभव मिळाला. सध्या राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांपुढे आणि सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी अधिक आहे.

जानेवारीच्या शेवटच्या पंधरवडय़ात उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली. त्यानंतर थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याच्या दिशेने येऊ लागले. मात्र, याच काळात दक्षिणेकडून राज्यात उष्ण वारे येत असल्याने या काळात किमान तापमानात मोठी घट होऊ शकली नाही. त्यामुळे दीर्घकाळ गारवा राहिला नाही. फेब्रुवारी उजाडताच दक्षिणेकडील उष्ण वाऱ्यांचे प्रवाह थांबले आणि राज्यात गारवा अवतरला. सुमारे आठवडाभर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात काही ठिकाणी रात्रीचे किमान तापामान १० अंशांखाली गेले होते. कोकणातही मुंबईसह सर्वच भागांत किमान तापमान सरासरीखाली गेले होते. १६ तारखेनंतर हवामानात विलक्षण बदल झाला. अरबी समुद्र ते विदर्भापर्यंत मराठवाडामार्गे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. समुद्रातून जमिनीकडे बाष्प येऊ लागले. त्यामुळे गारवा पूर्णपणे गायब होऊन पावसाळी स्थिती निर्माण झाली.

गारठा वाढण्याची शक्यता

फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाने उसळी घेतली आहे, त्यातच वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन गारवा अवतरण्याची चिन्हे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहेत.