Pune News : वजन कमी करण्याचे सेंटर केले स्थलांतरित; न घेतलेल्या थेरपीचे पैसे कंपनीला परत करावे लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी थेरपी सुरू केल्यानंतर संबंधित सेंटर अचानक स्थलांतरित करणे कंपनीला महागात पडले आहे. सेंटर बदलल्याने न घेतलेल्या उपचाराचे पैसे कंपनीला उपचार घेणा-या महिलेला परत द्यावे लागणार आहे. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी याबाबत आदेश दिला. या बाबत अन्नपूर्णा एस. माधवनवर (रा. घोरपडी) यांनी डिफाईन एस्थेटिक्‍स (एन.आय.बी.एम रस्ता, कोंढवा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. न घेतलेल्या थेरपीचे 12 हजार 960 रुपये आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी आणि तक्रारखर्च म्हणून 20 हजार रुपये कंपनीने तक्रारदाराला द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

आयन मॅग्नम या मशिनद्वारे 45 मिनिटांची एक अशा 10 थेरपी घेतल्यास वजन कमी होईल, असे कंपनीने तक्रारदारांना सांगितले. त्यासाठी 20 हजार 600 रुपये फी निश्‍चित करण्यात आली. थेरपीचे सेंटर तक्रारदार यांच्या घराजवळ असल्याने व त्यांच्या वेळेत तेथे जाणे शक्‍य असल्याने त्यांनी थेरपी घेण्याचे ठरवले. मात्र तीन थेरपी घेतल्यानंतर कंपनीने उपचाराचे सेंटर फातिमानगर येथून कोंढव्यात स्थलांतरित केले. त्यामुळे थेरपीसाठी जाऊन येण्यास तक्रारदारांना उशीर होत. तसेच तक्रारदारांच्या घरी वृद्ध आई असल्यामुळे त्यांना संध्याकाळी सातनंतर उपचारासाठी जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पुढील थेरपी घेणे शक्‍य नसल्याने त्याचे पैसे परत देण्याची मागणी तक्रारदार यांनी केली. मात्र त्यास कंपनीने नकार दिला. तक्रारदार यांनी थेरपीसाठी दिलेल्यापैकी 12 हजार 960 रुपये, मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये आणि तक्रारखर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी करणारी तक्रार आयोगात दाखल केली होती.

कंपनीने कोणत्याही न्यायोचित कारणांशिवाय रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान करून अनुचित व्यापारी प्रथेचा वापर केला, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.