Pune News : अनधिकृत बांधकामांवर पालिका कधी दाखल करणार गुन्हे ? कोंढवा पोलीस ठाण्यात आठवड्यानंतरही एकही ‘फिर्याद’ नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (बासित शेख) – कोंढव्यात अनधिकृत बांधकामे करणारे जागा मालक आणि विकसकांवर महापालिकेने कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीम सुरु केली आहे. विशेष मोहीम मध्ये २५ अभियंत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ११ जानेवारीपासून महापालिकेने ही मोहीम सुरु केली असली तरी अद्याप एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

महापालिकेच्या अभियंत्यांनी जागा पाहणी करणे, यापूर्वी संबंधितांना पाठवलेली नोटीस आणि केलेली कार्यवाही याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही मोहिम ३१ मार्च पर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.

कोंढव्यात गेल्याच आठवड्यात महापालिकेने नगरसेवकांच्या मागणीवरुन काही बेकायदेशीर बांधकामांवर तात्पुरती कारवाई केल्याचा आभास निर्माण केला होता. निवडक बेकायदा बांधकामांवर जाऊन अधिकार्‍यांनी सर्वे नंबर ४३, नुराणी कब्रस्तान समोर व इमामनगर या दोन ठिकाणी भोके पाडून कारवाई केल्याचा देखावा केला होता.

महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे शहरातील तसेच कोंढवा परिसरातील बेकायदा बांधकामांची सर्व माहिती असते. केवळ स्थानिक नगरसेवकांचा कारवाईला विरोध असल्याने ते कारवाई करु शकत नाही हे वास्तव आहे. जर महापालिकेकडे सर्व माहिती असताना वेळोवेळी या बांधकामांना त्यांनी नोटिसा दिलेल्या असताना आठवड्याभरात विकसकांवर व जागा मालकांवर एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते. ज्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली स्थानिक पोलीस ठाण्यात त्याची फिर्यादही दिली गेली नाही .

दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम ३९७ (अ), (१), (ब) या कलमानुसार डिसेंबर २० पासून बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. १ डिसेंबर २० रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात ७, वाकड ३ आणि देहुरोड पोलीस ठाण्यात ३ असे एकाच दिवशी १३ गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी पिंपरी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी वाकड १२, चिंचवड १, पिंपरी १४, आणि एम आय डी सी २ असे एकूण २९ गुन्हे एकाच दिवशी दाखल केले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध भागात झालेल्या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध इतके गुन्हे दाखल होत असताना पुणे महापालिका बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध इतके बोटचेपी भुमिका का घेत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

‘पोलीसनामा’ने उठविला होता हा प्रश्न
कोंढव्यात महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तात्पुरती कारवाई केल्यानंतर ‘पोलीसनामा’ने हा प्रश्न उठविला होता. पिंपरी चिंचवड महापालिका बेकादेशीर बांधकामांवर फौजदारी गुन्हे दाखल करत असताना पुणे महापालिका का गुन्हे दाखल करत नाही. पीएमआरडीए बेकायदेशीर इमारतीं जमीनदोस्त करत असताना पुणे महापालिका केवळ जुजबी कारवाई का करते, अशा नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने बेकायदेशीर बांधकामांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती.त्याचे काय झाले ?