Pune News : विधवेची जमीन बळकावली; पिट्याभाईचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   विधवा महिलेची जागा बळकावून तिला धमकाविल्या प्रकरणात मेहबूब शेख ऊर्फ पिट्याभाई याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.

अंधेरी ईस्ट (मुंबई) येथील महिलेची सय्यदनगर सर्व्हे क्रमांक ७५ मध्ये जागा आहे. मेहबूब याने संबंधित जागाचे साथीदारांसह बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर जागेचा ताबा घेत पत्राशेड उभारत ते बांगलादेशी नागरिकांना भाड्याने दिले. या महिलेस त्याने सय्यदनगर आणि मुंबई येथे जात वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने पुणे पोलिसांकडे पाच वर्षे तक्रारी देत पाठपुरावा केला. तिने दिलेल्या पुराव्यानंतर मेहबूबवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी या अर्जास विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. पोलिसांनी या प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे जमा केले आहेत. हा गुन्हा शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन तपास करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने मेहबूब यांचा अटकपुर्व जमीनाचा अर्ज फेटाळला.