Pune News : कोथरूड परिसरातील थरारानंतर गव्याला इंदिरानगर येथे पकडलं, रेस्क्यू ऑपरेशन ‘यशस्वी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भल्या सकाळी कोथरूड परिसरात गवा (रानटी प्राणी) आल्याची घटना घडल्यानंतर वनविभाग आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी दाखल झाले होते. गवा दोन ते अडीच तास होता. या कालावधीत वनविभागाला त्याला पकडण्याची तयारी करत असतानाच गवा मात्र पुन्हा पळून गेला, वनविभाग त्याला पकडण्यासाठी त्याचे मागे धावाला. परंतु, सकाळी आठ ते साडे बारा या साडे चार तासांच्या थरारांनंतर त्याला इंदिरानगर येथे पकडण्यात यश आले आहे.

कोथरूड परिसरातल्या महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले.  त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही काळाने तो गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी  गव्यापासून दूर पळ काढला. गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान, त्याने येथील एक गेट देखील धडका देऊन तोडले आहे.

दरम्यान गवा असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभाग आणि पुणे महापालिकेला कळवली. वन विभागाचे अधिकारी व कोथरुड पोलीस याठिकाणी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण गवा महात्मा सोसायटीतून पळाला. चंद्रकांत पाटील रहात असलेल्या सोसायटीत शिरला. पुन्हा काही वेळाने गवा येथून थेट कोथरुड डेपो परिसरातील इंदिरानगर परिसरात गेला. त्यानंतर त्याचे मागे असणाऱ्या पोलीस आणि वनविभागाने त्याला पकडण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केले. अनेक प्रयत्नानंतर या गवाला या परिसरात वन विभागाने पकडले आहे.

वनविभागानं त्याला आतापर्यंत 3 इंजेक्शन दिली आहेत. गव्यावर जाळी टाकून त्याला पकडण्यात आलं आहे. वन विभाग आणि महापालिका, पोलिस पथकानं हे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं होतं. दरम्यान, गव्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.