Pune News : कुंटणखाण्यात डांबलेल्या महिलेची झाली सुटका; ग्राहकाने मुलाला संपर्क करून दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ४५ वर्षीय महिलेला बुधवार पेठेतील कुंटणखाण्यात व्यवसाय करण्यास पाठवलेल्या महिलेची एका ग्राहकाच्या सजकतेमुळे मुलाने सुटका केली. संबंधित ४५ वर्षीय महिलेला दोन मुले आहेत. नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला २०१८ साली पुण्यात आणले आणि देहविक्री करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले. त्यामुळे तेथून आपली सुटका कशी करायची या प्रयत्नात ती होती. तिच्या बाबत घडलेला प्रकार तिने एका ग्राहकाला सांगितला. तेथून बाहेर पडण्यासाठी तीने त्याकडे मदत मागितली. तिची कहानी एकूण त्याने तिला मदत करायचे ठरवले. महिलेने तिच्या मुलाचा नंबर त्यांना दिला. त्या व्यक्तीने मुलाला संपर्क करीत आई विषयीची माहिती त्याला दिली. त्यानंतर मुलगा आपल्या कुटुंबीयांना घेऊन पुण्यात आला. ही सर्व हकिकत त्याने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या कुंटणखान्यात छापा टाकून महिलेची सुटका केली.

संबंधित महिलेची सुटका केल्यानंतर तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. तिचा ताबा मिळण्याबाबत मुलाने न्यायालयात धाव घेतली. त्याला ॲड. पुष्कर दुर्गे आणि ॲड. तेजलक्ष्मी धोपावकर यांनी मदत केली. पीडित महिला गरज पडेल तेव्हा साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहील. तिची काळजी घेण्यास मुलगा सक्षम आहे, असे सांगून तिची बाजू ॲड. धोपावकर यांनी मांडली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने महिलेचा ताबा मुलाकडे सोपवला.

पॉलिसीच्या कागदपत्रांवरून नाते झाले शाबित :
संबंधित महिला व तिचा मुलगा यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे बंगाली भाषेत असल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत अडसर निर्माण झाला होता. परंतु वकिलांनी दोघांची एलआयसी पॉलिसी न्यायालयात दाखल केली. ज्यामध्ये इंग्रजी भाषेत दोघांच्या नात्याबददल लिखित पुरावा होता, असे ॲड. धोपावकर यांनी सांगितले.