Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेमधील एका इमारतीत महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, तपास सुरू (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील सदाशिव पेठेत काम सुरू असणाऱ्या एका इमारतीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने ओळख पटलेली नाही.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेत एका जुन्या घराच्या आत काम सुरू आहे. त्यामुळे तेथे कोणी राहत नाही. दरम्यान, आज आत मधून कुबट दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची ओळख पटवणे अडचणीचे ठरत आहे. पोलिसांनी जवळपासच्या परिसरात माहिती घेण्यास व चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.