Pune News : विरोध झुगारून वेल्ह्यात गुंजवणीच्या पाईपलाईनचे काम सुरु

वेल्हे: तालुक्यातील गुंजवणी धरणातून पुरंदरला बंद पाईपलाईन द्वारे पाणी नेहण्यासाठी विरोध होता. मात्र आता हा विरोध डावलून गुंजवणी धरणाच्या दिशेने पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यामुळे विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला घेऊन जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गत महिन्यात पाईपलाईनच्या कामासाठी वेल्ह्यात पाईप आणले जात होते.यावेळी तालुक्यातील गुंजवणी संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी यास विरोध करुन अस्कवडी या ठिकाणी पाईप लाईनसाठी आणलेले पाईपांचे ट्रक अडविले होते. त्यानंतर हे काम थबले असे वाटले होते. परंतु महिन्याभरानंतर प्रत्यक्ष कामाचं सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट एल अ‍ॅन्ड टी कंपनीस देण्यात आले आहे.

दरम्यान, गुंजवणीचे पाणी पुरंदरला नेहण्याअगोदर वाजेघर, वांगणी खोऱ्यास उपसा योजना करण्याची मागणी गुंजवणी संघर्ष समितीच्या माध्यमातुन करण्यात आली होती. मात्र, अजूनदेखील हा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे. गुंजवणीच्या पाणी वाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी किती मिळणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाही पुरंदरला पाणी नेह्ण्याचा अट्टहास केला जात असून प्रत्यक्षात पाईपलाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

या संदर्भात बोलताना गुंजवणी संघर्ष समितीचे पदाधिकारी अमोल नलावडे म्हणाले, पाईपलाईनच्या कामास आमचा विरोध आहे. मात्र, सध्या गुंजवणी धरणासाठी आरक्षित जागेवर हे काम सुरु आहे. मात्र त्यानंतर खासगी जागेतून होणाऱ्या कामास आमचा विरोध राहणार आहे.

पाईपलाईनचे काम करु देणार नाही: धरपाळे
गुंजवणी संघर्ष कृती समिती अध्यक्ष दिनकर धरपाळे म्हणाले, गुंजवणी धरणातील पाणीवाटप कसे केले जाणार हे वेल्हेकरांना अजून माहिती नाही. तसेच वाजेघर,वांगणी,रांजणे उपसा योजनेस मंजुरी अद्याप मिळाली नाही त्यामुळे मागण्या मान्य होत नाही तो प्रयत्न पाईपलाईनचे काम करु देणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे.

धरणासाठी आरक्षित केलेल्या जागेतुन पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. वाजेघर व वांगणीसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे.लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे. संतोष डुबल, अभियंता गुंजवणी धरण.