Pune News : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाच्या (गुन्हे) रायटर महिलेला 5 हजाराची लाच घेताना पकडलं, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातच 5 हजार रुपयांची लाच घेताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.

श्रद्धा अकोलकर असे पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या रायटर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार यांना त्यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीच्या पथकाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात आज सापळा कारवाई दरम्यान एसीबीने श्रद्धा अकोलकर यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.