Pune News : हडपसर परिसरातील अ‍ॅमोनोरा मॉल जवळ भरधाव वाहनाने युवकाला चिरडले, जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरातील अ‍ॅमोनोरा मॉल येथे एका भरधाव अज्ञात वाहनाने मजुराला चिरडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. वाहन चालक मात्र पसार झाला आहे.

अजय गायकवाड (वय 25) असे मृत्यू झालेल्या या मजुराचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तो कामासाठी पुण्यात आला होता. तो मजुरीचे कामे करत असे. येथील लेबर कॅम्प येथे राहत होता. दरम्यान काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो अ‍ॅमोनोरा मॉल समोरून पायी चालत जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राऊत यांनी धाव घेतली. तसेच अजय याला ससून रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.