Pune News : जागतिक स्तरावरील कोर्समध्ये चमकल्या जि. प. शाळेतील शिक्षिका, होतंय सर्वत्र ‘कौतुक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकांच्या माध्यमातून नवोपक्रमांचे रुपांतर जागतिक स्तरावरील यशस्वी कोर्समध्ये झाले. औरंगाबाद येथील राज्य आंग्लभाषा संस्थेच्या सुचिता माहोरकर, अंबरनाथ (जि. ठाणे) येथील सुदर्शना शिरुडे आणि उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) टिळेकरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका अजिता गांजाळे यांनी हा उपक्रम राबविला आहे, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ईव्हीओ या संस्थेने शिक्षकांकडून वेगवेगळ्या संशोधन केलेले प्रकल्प मागविले होते. संस्था शिक्षकांना तंत्रज्ञावर आधारित प्रशिक्षण देत मार्गदर्शन करतात. त्यामधून गुणवत्तेनुसार निवड करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते, असे अजिता सुभाष गांजाळे यांनी सांगितले.

गांजाले म्हणाल्या की, इलेक्ट्रिक व्हिलेज लाइन (ईव्हीओ) य़ा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग शिक्षकांसाठी घेतले जातात. त्यामध्ये टेक्नॉलॉजी फॉर स्पोकन इंग्लिश या अभ्यास वर्गाच्या प्रशिक्षणाचे नियोजन व कार्यवाही करण्याची जबाबदारी तिन्ही महाराष्ट्रातील दोन जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका आणि राज्यस्तरीय शैक्षणिक संसाधन एक अशा तिघींनी समर्थपणे सांभाळली. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो जगभर पोहोचविण्यात यशस्वी झाला आहे. जगभरात 11 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान हा कोर्स ऑनलाइन माध्यमातून राबविण्यात आला. या कोर्ससाठी जगभरातून 223 जणांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये महाराष्ट्रातील संख्या लक्षणीय आहे. या कोर्समधील यशस्वी शिक्षकांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर मॉडरेटर म्हणून नामोल्लेख केला गेला आहे, ही बाब आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे वैचारिक मतप्रवाह आणि त्यातून साकारलेला कोर्स महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिक्षकांसाठी व्यासपीठ मिळाले, ही बाब अभिमानास्पद आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी पुढील वर्षी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.