‘एल्गार’ची कागदपत्रे NIA कडे ‘सुपूर्द’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील कागदपत्रे आणि माहिती घेण्यासाठी आलेल्या एनआयएचे पथकाला बुधवारी संपूर्ण कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. केंद्र सरकारने एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर या गुह्यातील माहिती घेतली जात होती. यापुर्वीही पथकाने पुणे पोलिसांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून 7 जणांचे पथक पुणे पोलीस आयुक्तालयात होते. पुणे पोलिसांचे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्याकडून खटल्यासंबंधी महत्वाची माहिती पथकाने घेतली.

एनआयएच्या पथकाकडून लहान सहान मुद्यांवर माहिती घेणे सुरू होते. याप्रकरणात जप्त करण्यात आलेला डाटा २५ टीबी पेक्षा जास्त असून हा डाटा आणि त्यासंबधीची कागदपत्रे मुंबई येथे वर्ग करण्यात आली.

एल्गारचा तपास आणि प्रकरणाची सर्व कागदपत्रे, मुद्देमाल एनआयएकडे सोपविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बुधवारी एल्गार प्रकरणाची सर्व कागदपत्रे एनआयएकडे सोपविण्यात आली. येथून पुढे हे प्रकरण मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात चालविण्यात येणार आहे.