Pune : कोकेनची तस्करी करणार्‍या नायजेरियन तरूणाला गुन्हे शाखेकडून अटक, सव्वा चार लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोकेन हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा चार लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. कोंढव्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

शमसीद्दीन ओमोटोला हसन (वय 48) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात लॉकडाऊन काळात गुन्हे शाखा गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यावर नजर ठेवून आहेत. यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाला एकजण कोंढव्यात राहत असून, तो कोकेन हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार याची खातरजमा केली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून छापा टाकला. तसेच त्याची झडती घेतली असता 4 लाख 16 हजार रुपयांचे 52 ग्रॅम कोकेन मिळाले. चौकशी केल्यानंतर तो विक्री करत होता. त्याने हे कोकेन कोठून आणले आणि तो कोणाला विक्री करत होता, याची माहिती घेतली जात आहे. त्याच्याकडून एकूण 5 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, कर्मचारी प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर यांच्या पथकाने केली आहे.